मराठी व्याकरण : श्ब्दांच्या जाती
श्ब्दांच्या जाती चे दोन प्रकार- विकारी(सव्यय) आणि अविकरी(अव्यय) आणि या मधे भाग पडतात.
विकारी/(सव्यय) चे प्रमुख प्रकार.
1. नाम
2. सर्वनाम
3. विशेषण
4. क्रियापद
अविकरी(अव्यय) चे प्रमूख प्रकार .
1. क्रियाविशेषण अव्यय
2. शब्दयोगी अव्यय
3. उभयान्वयी अव्यय
4. केवलप्रयोगी अव्यय
1. नाम :
आजूबाजूल असणाऱ्या प्रत्यक्षात किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्याच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे असतात, त्यांना 'नाम' असे म्हणतात.
उदा. देश, भारत, भाषा, मराठी, सौंदर्य, उदारता इत्यादी.
नामाचे प्रकार :-
1) सामान्यनाम :
एकाच प्रकारच्या पदार्थातील सम गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते, त्याला 'सामान्यनाम' असे म्हणतात. उदा. मुलगा, शाळा, नदी, धर्म, फूल इत्यादी. कळप, वर्ग, सैन्य, सभा, गर्दी, संथ, समिती ही समुहाला दिलेली नावे आहेत.
तसेच सोने, तांबे, दुध, साखर, कापड हे पदार्थांची नावे आहेत.
(वरील दोन्ही प्रकारची नावे मराठीत सामान्यनामातच येतात.)
2) विशेषनाम :
ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील विशिष्ट एका व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तुचा बोध होतो, त्यास 'विशेषनाम' असे म्हणतात.
उदा. वैभवी, वैष्णव, गंगा, ख्रिश्चन, जाई इत्यादी.
3) भाववाचक किंवा धर्मवाचक नाम :
ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म, भाव यांचा बोध होतो, त्यास भाववाचक नाम' किंवा 'धर्मवाचक नाम' असे म्हणतात, शब्दांना य, त्व, पण/पणा, ई, ता, की, गिरी, वा, आई यासारखे प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार होतात.
(नोट. सामान्यनामाचे अनेकवचन होऊ शकते पण विशेषनामे व भाववाचक नामेही एकवचनीच असतात)
4) धातूसाधित नाम :
जी नामे धातुपासून बनवली जातात, त्यांना 'धातुसाधित नामे' असे म्हणतात.
उदा, 1. चालणे हा एक व्यायाम आहे.
2. त्याला खेळणे आवडते.
2. सर्वनाम :
नामाऐवजी येणा-या विकारी शब्दाला 'सर्वनाम' असे म्हणतात.
उदा. मी, तू, आपण, स्वतः, जो, काय इत्यादी.
सर्वनामाचे प्रकार :-
1) पुरुषवाचक सर्वनाम:
बोलणारया किंवा लिहिणाऱ्या व्यक्तींना व्याकरणात 'पुरूष' म्हणतात.
खालील तिनही वर्गातील नामाऐवजी येणाऱ्या सर्वनामांना 'पुररूषवाचक सर्वनामे' असे म्हणतात.
1. आपण स्वतः विषयी बोलतो किंवा लिहितो.
2. आपण दुसयाविषयी बोलतो किंवा लिहितो.
3. आपण तिसऱ्याविषयी बोलतो किंवा लिहितो.
पुरुषवाचक सर्वनामांचे प्रकार :-
अ) प्रथम पुरुषवाचक सर्वनाम :
बोलणारा स्वत:चा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो, त्यांना प्रथम पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात.
उदा, मी, आम्ही, आपण इत्यादी.
ब) द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम :
ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो, त्यांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात.
उदा. तू, तुम्ही आपण इत्यादी.
क) तृतीय पुरुषवाचक सर्वनाम :
बोलणारी व्यक्ती ज्याच्या विषयी बोलते त्याच्याविषयी वापरलेले सर्वनाम म्हणजे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम होय.
उदा. तो, ती, ते, त्या इत्यादी.
2) दर्शक सर्वनाम :
जवळची किंवा दुरची वस्तू दाखवण्यासाठी जी सर्वनामे येतात त्याना 'दर्शक सर्वनामे' असे म्हणतात.
उदा. हा, ही हे (जवळची वस्तू दाखवण्यासाठी)
तो, ती, ते (दूरची वस्तू दाखवण्यासाठी)
3)संबंधी सर्वनाम :
वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामांना 'संबंधी सर्वनाम' असे म्हणतात.
उदा. जो, जी, जे, ज्या, इत्यादी.
4) प्रश्नार्थक सर्वनाम :
ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो, त्याला प्रश्नार्थक सर्वनाम' असे म्हणतात.
उदा. कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी इत्यादी.
5) सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम :
प्रश्नार्थक वाक्य व्यतिरीक्त इतरत्र वापरलेली कोण, काय ही सर्वनामे 'सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे' होत.
उदा. १) कोणी कोणास हसू नये.
२) त्या पेटीत काय आहे ते सांग.
6)आत्मवाचक सर्वनाम :
जेव्हा स्वतः' व 'आपण' या सर्वनामांचा अर्थ 'स्वत:' असा होतो. तेव्हा त्यांना 'आत्मवाचक सर्वनाम किंवा स्वत:वाचक सर्वनाम' असे म्हणतात.
उदा. १) मी स्वत: त्याला पाहिले. २) तो आपणहून माझ्याकडे आला.
१) 'आपण' या सर्वनामाचा योग :-
1)प्रथम पुरुषवाचक सर्वनाम - ‘आम्ही' या अर्थाने आल्यास
उदा. आपण अभ्यास केला तर पास होऊ.
2) द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम - 'तुम्ही' या अर्थाने आल्यास
उदा. आपण माझे काम करावे.
3)आत्मवाचक सर्वनाम - 'स्वत:' च्या अर्थाने आल्यास
उदा. आपले काम आपण करावे.
3. विशेषण आणि विशेष्य :
विशेषण :
नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला 'विशेषण' असे म्हणतात.
उदा. १) विजय हुशार मुलगा आहे. २) मी सातव्या इयत्तेत शिकते. ३) माझ्या गावी मी सुट्टीत जाते.
2) विशेष्य :-
विशेषण ज्या नामांबद्दल विशेष अशी माहिती सांगते, त्या नामाला 'विशेष्य' असे म्हणतात.
विशेषणाचे प्रकार :-
अ) गुणवाचक विशेषण :
ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा गुण किंवा विशेष दाखवला जातो, त्यास 'गुणवाचक विशेषण म्हणतात.
उदा. १) चांगली मुले. २) काळा कुत्रा. ३) हिरवे रान.
४) म्हातारी माणसे.
ब) संख्यावाचक विशेषण :
ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते, त्याला 'संख्यावाचक विशेषण' असे म्हणतात.
उदा. एक, दोन, तीन, दहा, पंधरा इत्यादी.
काही संख्या विशेषणे ही अनिश्चित संख्या किंवा परिमाण ही दाखवतात.
उदा. १) पुष्कळ माणसे. २) थोडी साखर. (परिमाण)
क) क्रमवाचक विशेषण :
जी विशेषणे नामाचा क्रम दर्शवतात, तेव्हा त्यांना क्रमवाचक विशेषण' असे म्हणतात.
उदा. पहिला, दुसरा, तिसरा, दहावा इत्यादी.
ड) आवृत्तिवाचक विशेषण :
ज्यातून ती संख्या पटीने कळते, त्यास ‘आवृत्तिवाचक विशेषण' असे म्हणतात.
उदा. निमपट, तिप्पट, दुप्पट, इत्यादी.
य) सार्वनामिक विशेषण :
सर्वनामापासून बनलेल्या विशेषणाला 'सार्वनामिक विशेषण' असे म्हणतात.
उदा, १) हा मनुष्य २) माझे पुस्तक ३) कोणते गाव ४) तिच्या वह्या.
र) धातुसाधित विशेषण :
धातुपासून कृदन्त रूप बनते. जेव्हा कृदन्त रूप बनते. जेव्हा कृदन्त रूपाचा वाक्यात विशेषणासारखा उपयोग होतो, तेव्हा त्याला धातुसाधित विशेषण' असे म्हणतात.
उदा. १) हसरी मुले सर्वांना आवडतात.
२) सडलेली फळे टाकून दे.
ल) अधिविशेषण किंवा पूर्वविशेषण :
जे विशेषण विशेष्याच्या आधी येते, त्याला अधिविशेषण किंवा पूर्वविशेषण असे म्हणतात.
उदा. १) शहाणी मुले शिस्तीने वागतात.
व) विधिविशेषण किंवा उत्तर विशेषण :
जे विशेषण विशेष्यांच्या नंतर येते, त्याला विधिविशेषण किंवा उत्तर विशेषण असे म्हणतात.
उदा. १) मुले शहाणी आहेत.
Post a Comment