Translate

डोळ्याला पाणी येणं हा मायेचा धर्म असला, तरी उडत्या पाखराला निळ्या नभाचा मार्ग दाखवणं हा शिक्षकाचा धर्म आहे. अत्यंत प्रतिकूल, खडतर परिस्थितीत पार्ट टाइम नोकरी करतमहाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. वक्तृत्वाचे, व्यक्त होण्याचे संस्कार शालेय जीवनापासूनच साकरवाडीत झाले होते.नोकरीच्या शोधात असताना प्रा. शरदचंद्र साळुखे यांच्या सेंट मोनिका स्कूल वैजापूर शाळेत शिक्षक म्हणून सेवेत रुजू झालो. समोरच्या विद्यार्थ्यांत देव अनुभवायचा हे व्रत अंगिकारलं. या पहिल्यावहिल्या नोकरीतील अनेक अनुभव माझ्या लक्षात आहेत,काहींनी आनंदाश्रू दिले, तर काहींनी भावनिक केलं.



एक विद्यार्थिनी एका खेडेगावातून शाळेत यायची.नाव बहुदा सोनाली असावं. काही वेळा उशिरा शाळेत येणं, कमी गुण प्राप्त होणं, कुठल्यातरी ओझ्याखाली दबलेली वाटायची. चर्चेसाठी एकदा पालकांना शाळेत बोलावलं. चर्चेअंती ते म्हणाले, की सर, घायगावपासून आमची वस्ती तीन-चार किलोमीटर दूर आहे.घायगावहून वैजापूरला आणि वैजापूरहून पुन्हा शाळेत असा एकूण तिचा रोज १२ ते १३ किलोमीटर पायी प्रवास जाता-येता होतो. परत कुटुंबाचा सायंकाळचा बऱ्याच वेळा स्वयंपाक तिच्याकडेच असतो. घरकामआणि शेतीकामही ओघानं आलंच. बऱ्याच वेळा सायंकाळी वस्तीवर लाइट नसतातच, लेकरू तरी काय करणार? हा तिचा शिकण्यासाठीचा संघर्ष ऐकून मी थक्क झालो. त्या प्रसंगी ती रडत होती. तिची संघर्षगाथा ऐकून मलाही रडू आलं.मधल्या जेवणाच्या सुट्टीत विद्यार्थी मैदानावर जेवायला बसतात, खेळतात. सवयीप्रमाणे त्यांच्या जवळून गेलं, की मुलं आनंदित होतात. त्यांचा डबा खाण्याचा आग्रह करतात. काही मुलं आणि मुली त्यांच्या निरागसतेनं नेहमीच लक्ष वेधून घेतात.


एका विद्यार्थिनी जवळून जात असताना तिनं लक्ष वेधून घेतलं. ज्या वर्गात अध्यापन करत नाही त्या विद्यार्थ्यांचा परिचय नसतो. सहज तिची निरागसता बघताना तिला नाव आणि वर्ग विचारला. वडील काय करतात विचारताच ती गोंडस विद्यार्थिनी कोमेजली. बोबड्या बोलात अश्रुमिश्रित भावात म्हणाली, 'सर, मेरे पापा की न डेथ हो गयी.' त्या चिमुरडीला 'डेथ'चा अर्थही माहीत नसावा इतकं निरागस उत्तर तिचं मी ऐकलं.एकदा माझी प्रकृती बरी नसल्यानं शाळेत चार-पाच दिवस जाता आलं नाही. रजेनंतर शाळेत गेलो.मैदानावर दहावीतील एक विद्यार्थी, अंश जवळ आला.ढसाढसा रडायला लागला. मी संभ्रमात पडलो. त्याला समजावत आणि शांत करत रडण्याचं कारण विचारलं.तो पुन्हा रडतच म्हणाला, सर, तुम्ही कधीच घरी राहत नाही. चार-पाच दिवस शाळेत आला नाहीत. आम्हाला आठवण आली. आम्ही सर्व जण अस्वस्थ होतो. तुमची काळजी वाटली. बालवयातली त्याची ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया, माया बघून मीच रडायला लागलो.


मी कोपरगाव-वैजापूर प्रवास करतो. एक दिवस वैजापूरहून कोपरगावला जाण्यासाठी वैजापूर स्थानकावर कोपरगाव बसमध्ये शिरलो. बसमध्ये प्रचंड गर्दी होती. दारातच गर्दीत उभा राहिलो. काही वेळाने आवाज आला, की सर, इकडे या आणि माझ्या जागेवर बसा. माजी विद्यार्थी अजय आवाज देऊन बोलावू लागला. मी त्याला म्हणालो,'अरे अजय, गर्दी खूप कोपरगावपर्यंत जागा मिळणार नाही. तुला तासभर उभे राहावे लागेल.तत्काळ त्यानं उत्तर दिले, तुम्ही आमच्यासाठी २५-३० वर्ष उभे आहात. मी तुमच्यासाठी तासभर उभे आहे. तुला राहू शकत नाही का? त्याचं कृतज्ञतेचं बोलणं आणि त्याच्या डोळ्यांतील पाणी पाहून बसमधील प्रवासीही थक्क झाले. त्याच्या हट्टापायी मला बसावं लागलं.


पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांना जीवनोपयोगी,स्वावलंबनाचे, श्रम प्रतिष्ठेचे प्रेरणादायी विचार व संस्कार दिले. कष्टाच्या कमाईचे, श्रमसंस्काराचे महत्त्व सांगितले. यातून प्रेरणा घेऊन वैभव नावाच्या विद्यार्थ्याने उन्हाळ्याच्या सुट्टीत एका कापड दुकानात काम केलं.जेव्हा त्याला महिन्याचा पगार मिळाला तेव्हा त्याचा अभिमान वाटल्यानं मी नकळत रडू लागलो. अनेक पाठ आणि कविता त्यातील प्रासंगिक घटना जेव्हा मी समरस होऊन अध्यापन करतो, तेव्हा संपूर्ण वर्ग माझ्या डोळ्यांत आलेले अश्रू पाहून रडताना पाहण्याचं भाग्य मी अनेक वेळा अनुभवले आहे. दहावीचा निरोप समारंभ हा दर वर्षी मन हेलावून टाकणारा असतो. हे रडणं कमजोर मनाचं प्रतीक नसून, मनाच्या उत्कट भावनेचं सामर्थ्यशाली रूप आहे.


Tag: latest Marathi news, Marathi news paper, live Marathi news

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने